मी भक्त प्रल्हाद आहे आणि त्याच्याप्रमाणे मी माझ्या जागेवरच बसणार - संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या (ता. ७) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेत चर्चादेखील केली. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी “रामलल्लाच्या कृपेनं महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. आम्ही रामलल्लाचा प्रसाद मिळाला असं मानतो,” अशी प्रतिक्रिया शिवसेना संजय राऊत यांनी दिली. तसेच हा पूर्णपणे धार्मिक कार्यक्रम असेल. यात कोणतंही राजकारण करण्याची गरज नाही,” असंही त्यांनी नमूद केलं.
संजय राऊत म्हणाले, उद्या उद्धव ठाकरे हे प्रथम लखनौला जातील. त्यानंतर ते अयोध्येला जातील. शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण काल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. करोनाचा जसा प्रादुर्भाव पसरतोय त्यामुळे जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरतीचा कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि काही नेते मंडळीही त्या ठिकाणी असणार आहेत. अयोध्येत शांतता राहावी, तसंच मंदिर उभारणीतही शिवसेना सहभागी होऊ इच्छित असल्याने त्याबाबत मुख्यमंत्रीच माहिती देतील. त्यांच्या दौऱ्याला कोणाचाही विरोध नाही. मी सर्वांना भेटलो आहे. कोणाच्या विरोधावर आमचं लक्ष नाही. देशातील सर्वांनी रामलल्लाचं दर्शन घ्यावं अशी आमची इच्छा आहे,” असंही राऊत यावेळी म्हणाले.
“सरकार सरकारच्या जागी आणि आस्था आस्थेच्या जागी आहे. काँग्रेसच्या लोकांनही या ठिकाणी यावं. ज्या लोकांना आस्था आहे त्या पक्षाच्या लोकांनीही या ठिकाणी यावं असं आम्हाला वाटतं. मंदिर निर्मितीचं कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे. यासाठी अनेक कारसेवक, साधू संतांनी बलिदान दिलं आहे. न्यायालयानं आता निर्णय दिला आहे. सर्व पक्षांच्या लोकांनी या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावं, असं आम्हाला वाटतं,” असं राऊत म्हणाले.