दुष्काळ आणि विधानसभा निवडणुक

Narayana Molleti

जुन महिना सुरु झाला तरी अद्यापही महाराष्ट्रात पाऊस सुरु झालेला नाही. हवामान खाते जरी पावसाच्या अंदाजाची तारीख पे तारीख  जाहीर करीत असले तरी अद्यापही मान्सुन महाराष्ट्रात दाखल झालेला नसल्याने शेतकर्‍यांसह सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे.  पाऊस लांबल्याने हवालदिल झालेला शेतकरी, जनावरांना चारा नाही, हातांना रोजगार नाही त्यामुळे काय करावे अशा विवंचनेत सापडला आहे.


शासनाने जरी पशूधन वाचविण्यासाठी चारा छावण्या सुरु केल्या  असल्या तरी त्यामधील जाचक अटींमुळे छावणीचालक संकटात सापडले आहेत. इकडे शेतकरी जरी संकटात सापडला असला तरी राजकारणी लोकांना मात्र आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या युतीने 48 जागांपैकी भारतीय जनता पक्षाने 25 जागांवर तर शिवसेनेने  23 जागांवर आपले उमेदवार उभे केलेले होते. त्यापैकी भारतीय जनता पक्षाला 25 पैकी 23 जागांवर विजय प्राप्त झाला तर शिवसेनेला 23 पैकी 18 जागांवर विजय प्राप्त झाला. तर काँग्रेस राष्ट्रवादीसह महाआघाडीच्या अनेक उमेदवारांचे धक्कादायक पराभव झाले.


यामध्ये सर्वात धक्कादायक पराभव म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा नांदेड मधून भारतीय जनता पक्षाच्या प्रतापराव चिखलीकर यांनी केलेला पराभव तर हातकणंगले येथील महाआघाडीच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे उमेदवार राजू शेट्टी यांचा शिवसेनेच्या धैर्यशील माने यांनी केलेला पराभव तर औरंगाबाद येथील शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा एआयएमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी केलेला पराभव होय. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला जरी यश मिळालेले नसले तरी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाडण्यास मदत केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित  बहुजन  आघाडीला महाआघाडीत सन्मानाने जागा मिळतील अशी आशा निर्माण झाली आहे.


शेतकर्‍यांचा विरोध, अल्पसंख्याकाची नाराजी जरी विद्यमान सरकारच्या विरोधात असली तरी त्याचा म्हणावा तसा फायदा विरोधी पक्षाला उठवता आला नाही. भारतीय जनता पक्ष व  शिवसेनच्या आक्रमक प्रचारतंत्रापुढे काँग्रेस राष्ट्रवादी ही प्रचारामध्ये अत्यंत कमी पडल्याचे दिसत होते तर काँग्रेस व राष्ट्रवादीची युती असली तरी प्रचारात मात्र यांचा एकत्रितपणा जनतेस दिसला नाही. नाही म्हणायला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मलाव रे तो व्हिडिओम म्हणत विरोधी पक्षांच्या प्रचारात जान आणली मात्र त्याचा म्हणावा असा फायदा विरोधी पक्षाला झाला नाही.


देशभरात चालू असलेली ईव्हीएम मशीनविषयीची कुजबुज महाराष्ट्रात सुद्धा चालू आहे मात्र सध्या तरी लोकसभेला भारतीय जनता पार्टी व शिवसेना यांच्या युतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे  आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेनेत प्रवेश करणार्‍यांची संख्या जास्त आहे. साधारणता ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीला मिळालेल्या यशामुळे विधानसभेला सुद्धा युतीलाच बहुमत मिळेल अशी युतीला आशा लागल्याने युती खुशीत आहे तर काँग्रेस राष्ट्रवादीला मात्र मरग़ळ आल्याचे चित्र दिसत आहे. सध्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागावाटपांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा चालू असली तर विरोधी पक्ष मात्र अजूनही लोकसभेच्या अपयशातून बाहेर पडण्यात तयार नसल्याचे दिसत आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भुमिकेकडे महाराष्ट्राच ेलक्ष लागलेले आहे. कारण लोकसभेच्यावेळी त्यांनी प्रचारात चांगलीच हवा निर्माण केली होती. त्यामुळे मनसेकडून निवडणुक लढविण्यासही अनेक उमेदवार इच्छुक आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी आत्तापासूनच राज्याचे दौरे करण्यास सुरुवात केली आहे आता ते विधानसभेला युती करतात की वंचित आघाडीप्रमाणे एकला चलो रे म्हणत स्वतंत्रपणे निवडणुक लढवतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर एआयएमआयएम पक्षाला औरंगाबाद मध्ये यश मिळाल्याने ते सुद्धा महाराष्ट्रात विधानसभेला ठराविक जागांवर आपले उमेदवार उभे करून आपली ताकद दाखवून देतील याबाबत शंका नाही.


Find Out More:

Related Articles: