तर आयपीएल होऊ शकते या पद्धतीने
कोरोना व्हायरसचा परिणाम जगभरातील क्रिडा स्पर्धांवर पाहिला मिळत आहे. आयपीएलच्या यंदाच्या सीझनवर देखील या व्हायरसचा परिणाम पाहिला मिळत असून, 29 मार्चला सुरू होणाऱ्या आयपीएलची तारीख पुढे ढकलून 15 एप्रिल करण्यात आली आहे. या संदर्भात बीसीसीआय आणि आयपीएल टीमच्या मालकांची देखील बैठक झाली.
टीम मालक आणि बीसीसीआयच्या बैठकीत अनेक पर्यायांवर चर्चा झाली. यामध्ये आयपीएलच्या सामन्यांची संख्या कमी करणे अथवा एका दिवशी 2 सामन्यांचे आयोजन करणे, या गोष्टींचा देखील विचार करण्यात आला.
संघांना चार-चारच्या दोन ग्रुपमध्ये विभागणे आणि त्यानंतर दोन्ही ग्रुपमधील टॉपचा दोन-दोन संघ नॉकआउटमध्ये प्रवेश करतील. असे आयसीसीच्या स्पर्धेत पाहण्यास मिळते. सध्या आयपीएलमध्ये राउंड रॉबिनचा नियम आहे. म्हणजेच प्रत्येक संघ एकमेंकाविरोधात खेळतो.
आधीच्या आयपीएल वेळापत्रकानुसार, केवळ पाचच दिवस असे होते जेथे दोन सामने खेळले जाणार होते. मात्र आयपीएल झाल्यास प्रत्येक दिवशी दोन सामने होऊ शकतात.
याशिवाय सामने मोजक्याच मैदानावर आयोजित केले जाऊ शकतात. ज्यामुळे खेळाडू आणि स्टाफला प्रवास कमी करावा लागेल. आणखी एक पर्याय म्हणजे विना प्रेक्षकांच्या सामन्यांचे आयोजन करणे. काही दिवसांपुर्वीच ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामना विना प्रेक्षकांचा पार पडला.