उद्योग क्षेत्रातील संधीचा मराठी तरूणांनी फायदा घ्यावा, सरकार आपल्या पाठीशी - उद्योगमंत्री सुभाष देसाई
राज्यात लॉकडाऊनच्या काळात 70 हजार उद्योगांना परवानगी दिलेली आहे. त्यापैकी 50 हजार उद्योग प्रत्यक्षात सुरू झाले आहेत. केंद्र शासनाने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये उद्योगांसाठी अनेक सवलती दिलेल्या आहेत. सेवा, उत्पादन क्षेत्राला दिलासा मिळालेला आहे. पर्यटन, वाहतूक आदी उद्योग क्षेत्रांसाठी मोठी संधी आहे. या संधीचा प्रत्येकाने लाभ घ्यावा, असं आवाहन उद्योगमंत्र्यांनी यावेळी केलं. कोरोनाच्या संकटकाळात औषध निर्माण क्षेत्राकडून मोठे काम होत आहे. या क्षेत्राला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी फार्मा पॉलिसी तयार करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं. यासाठी घेण्यात येणाऱ्या बैठकीत फार्मा उद्योजक, सीईओ, एक्सपोर्ट प्रमोशन काऊन्सिलच्या प्रतिनिधींना निमंत्रित करणार असल्याचंही देसाई म्हणाले.
मुंबई-पुणे-नाशिक या सुवर्ण त्रिकोणात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक आहे. परंतू कोरोनामुळे या भागाला सर्वाधिक फटका बसलेला आहे. भविष्यात अशी परिस्थिती ओढवू नये, यासाठी उद्योगांच्या विकेंद्रीकरणावर शासनाचा भर असेल तसंच गुंतवणूकदारांनी इतर जिल्ह्यांत आपले प्रकल्प सुरू करावेत, असंही आवाहन देसाई यांनी यावेळी केलं.