
बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, 'हीच ती वेळ' - राज ठाकरे
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील राजकीय समिकरण बदलले. भाजप शिवसेनेची भाजपसोबत असलेली पारंपारिक युती संपुष्टात आली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जुळवून घेताना शिवसेनेला आपला हिंदुत्ववादी बाणा थोडा नमता घ्यावा लागत आहे. आता याचाच फायदा उठवण्यासाठी राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झाली आहे. येत्या 23 तारखेला पहिल्यांदाच मनसेचा मेळावा पार पडतोय.
शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी या वेगळ्या विचारसरणीच्या पक्षांसोबत हातमिळवणी केली. मात्र काही शिवसैनिकांना हे रुचलेलं नाही. आता या नव्या राजकारणामुळे अस्वस्थ असलेल्या हिंदुत्ववादी व मराठीप्रेमी शिवसैनिकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न मनसेकडून करण्यात येत आहे. आता मनसेच्या नेत्यांनी शिवसैनिकांना साद घातली आहे. बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका, मनसेचा झेंडा हाती घ्या, असं आवाहन करण्यात आलं आहे.
मनसे चित्रपट शाखेचे अध्यक्ष अमेय खोपकर याविषयी एक ट्विट केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. त्यांनी या आघाडीला त्यांनी 'सपक महाखिचडी'ची असे म्हटले आहे. पोषक आहारासाठी राब राब राबलेल्या कार्यकर्त्यांच्या वाट्याला सपक महाखिचडी आली आहे. पण सच्च्या कार्यकर्त्यांनो, बाळासाहेबांच्या कडव्या शिवसैनिकांनो निराश होऊ नका... असा धीर ट्विटमधून देण्यात आला आहे. 'निर्लज्जपणे असाच सुरू राहील सत्तेचा खेळ... मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ...' बाळासाहेबांच्या जयंतीला 'मन'से सामील व्हा, असं आवाहन ट्विटमधून करण्यात आलं आहे.