आता पोलिसांसाठी असणार स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष, मुंबईत दोन हॉस्पिटल राखीव

Thote Shubham
मुंबई : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद व दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत व योग्य ती शासकीय नोकरी तसेच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल.

पोलिसांना तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेसबूकद्वारे संवाद साधताना स्पष्ट केले.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलिसांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे.


कोरोना विशेष कक्ष व नोडल अधिकारी
कोरोना संदर्भात प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलिसाला वा अधिकाऱ्याला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येत आहे.

जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील. तसेच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली.


कोरोना विरुद्धच्या लढाईत आपल्याला कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचा आहे. त्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी यावेळी केले.

 

Find Out More:

Related Articles: