दुप्पट वेगाने चार्ज होणारी बॅटरी तयार
चार्जिग लवकर संपणे ही स्मार्टफोन युजरची समस्या आता लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली असून दीर्घकाळ स्मार्टफोन चार्ज करणे भूतकाळात जमा होणार आहे. पर्ड्यू विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने लिथियम आयन बॅटरीचे नवे डिझाईन विकसित केले असून या चमूत भारतीय शास्त्रज्ञांचा समावेश आहे.
एसीएस नॅनो मटेरियल जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार बॅटरीमध्ये अँटीमनीचा वापर केला गेला आहे. यामुळे बॅटरीची लिथियम आयन संग्रहित करण्याची क्षमता वाढली आहे. त्यासाठी बॅटरीमध्ये नॅनोचेन संरचना इलेक्ट्रोडचा वापर केला गेला यामुळे बॅटरीची चार्जिंग क्षमता वाढते आणि चार्जिंग साठी लागणारा वेळ कमी होतो. त्यामुळे नवीन डिझाईनची बॅटरी स्मार्टफोन सह संगणकासाठी सुद्धा उपयुक्त आहे.
पर्ड्यू विद्यापीठातील संशोधक विलास पोळ आणि व्ही रामचंदन यांच्या म्हणण्यानुसार नवीन बॅटरी ३० मिनिटे चार्ज केली तर लिथियम आयन संग्रह करण्याची क्षमता दुप्पट होते असे दिसून आले. हा प्रयोग १०० वेळा केला गेला आणि दरवेळी हीच निरीक्षणे मिळाली. त्यामुळे मोठ्या बॅटरीमध्येही या नवीन डिझाईनचा वापर करणे शक्य आहे.