INDvsNZ T-20 Match टीम इंडियाकडून सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा सनसनाटी पराभव
टीम इंडियाने अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या हॅमिल्टनच्या तिसऱ्या ट्वेन्टी ट्वेन्टीत सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडवर सनसनाटी मात केली. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर 180 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण या आव्हानाचा पाठलाग करताना मर्यादित 20 षटकांत न्यूझीलंडच्या फलंदाजांना 179 धावा करता आल्या.
त्यामुळे टाय झालेल्या सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने दिलेलं 18 धावांचं आव्हान रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने पूर्ण करुन भारताला मालिकाही जिंकून दिली. भारताचा न्यूझीलंडमधला हा आजवरचा पहिलाच ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकाविजय ठरला आहे.
त्याआधी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने 89 धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा पाया घातला. पण ही जोडी फुटली आणि भारताच्या डावात एकही मोठी भागीदारी झाली नाही. रोहित शर्माने 40 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांसह 65 धावांची खेळी उभारली. लोकेश राहुलने 27 आणि विराट कोहलीनं 38 धावांची खेळी केली. न्यूझीलंडकडून हॅमिश बेनेटने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर मिशेल सॅन्टनर आणि कॉलिन डी ग्रँडहॉमने प्रत्येकी एक विकेट घेतली.
टीम इंडियाने दिलेल्या 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडकडून केन विलियमसनने 48 चेंडूत 95 धावांची खेळी केली. यामध्ये 8 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. मार्टिन गप्टिलने 31 धावांची खेळी केली. भारताकडून शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन आणि युजवेंद्र चहल, रवींद्र जाडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
किवींची फलंदाजी
आजच्या सामन्यात भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह लयीत दिसला नव्हता. परंतु कर्णधाराने सुपर ओव्हर फेकण्यासाठी बुमराहवरच विश्वास दर्शवला. परंतु बुमराहला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. न्यूझीलंडचा कर्णधार केन व्हिलियम्सन आणि मार्टिन गप्टीलने बुमराहने फेकलेल्या या ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा फटकावल्या. ओव्हरच्या पहिल्या दोन चेंडूंवर बुमराहने प्रत्येकी एक धाव दिली.
तिसऱ्या चेंडूवर व्हिलियम्सनने शानदार षटकार ठोकला. पुढच्या चेंडूवर एक खणखणीत चौकार फटकावला. पाचवा चेंडू व्हिलियम्सनला खेळता आला नाही. परंतु त्याने एक धाव (लेग बाय) चोरली. अखेरच्या चेंडूवर गप्टीलने चौकार फटकावला. दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने किवींनी भारतासमोर एका षटकात 18 धावांचे आव्हान उभे केले.
सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करण्यासाठी टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल मैदानात आले. सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी किवींचा कर्णधार व्हिलियम्सनने टीम साऊथीवर विश्वास टाकला. साऊथीला याआधी चार वेळा सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. परंतु या चारपैकी तीन सामन्याच किवींचा पराभव झाला आहे.
सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रोहित शर्माने दोन धावा काढल्या. यावेळी दोन्ही फलंदाजांमध्ये योग्य ताळमेळ नसल्याचे पाहायला मिळाले. यावेळी रोहित शर्मा दुसरी धाव घेताना बाद झाला असता. परंतु त्याला आज नशिबाने साथ दिली. पुढच्या चेंडूवर रोहितने एक धाव घेतली. भारताला आता जिंकण्यासाठी चार चेंडूत 15 धावांची आवश्यकता होती. यावेळी के. एल राहुलने खणखणीत चौकार फटकावला.
पुढच्या चेंडूवर राहुलने एक धाव घेतली.
आता टीम इंडियाला जिंकण्यासाठी दोन चेंडूत 10 धावा हव्या होत्या. रोहित शर्मा स्ट्राईकवर होता. साऊथीने मध्यमगतीने चेंडू फेकला. रोहितने या चेंडूवर जबरदस्त षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर भारताला जिंकण्यासाठी चार धावा हव्या होत्या. रोहितने या चेंडूवरदेखील षटकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला.