आत्मनिर्भर भारत: २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा अर्थमंत्र्यांकडून तपशीलवार उलगडा
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना संबोधित केले. आपल्या 30 मिनिटाच्या भाषणात त्यांनी देशा ‘आत्मनिर्भर’ म्हणजेच स्वावलंबी बनण्याचा नवा मंत्र दिला. पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत’ या अभियानासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली.
हे पॅकेज जीडीपीच्या 10 टक्के असल्याचेही त्यांनी नमूद केले. हे पॅकेज सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी असून देशासाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजूर तसेच कर भरणाऱ्या मध्यम वर्गासाठी आहे.
पंतप्रधानांनी त्यावेळी आपल्या भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यासंदर्भातील विस्तृत माहिती देतील, असे सांगितले होते. त्यानुसार पंतप्रधानांच्या या घोषणेच्या पार्श्वभूमीवर निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषद घेत २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा तपशीलवार उलगडा केला आहे.
सीतारमण यांनी यावेळी MSME उद्योगांना तीन लाख कोटींचे कर्ज देणार असल्याची घोषणा केली. याअंतर्गत सूक्ष्म, लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज देण्यात येईल. याकरिता कोणत्याही प्रकारच्या हमीची आवश्कता नसेल. जवळपास ४५ लाख MSME उद्योगांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याचीही गरज नसेल.
त्याचबरोबर सीतारमण यांनी EPFच्या बाबतीतील सरकारच्या मोठ्या निर्णयाची घोषणा केली. ज्यामध्ये १५ हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे. पगाराच्या २४ टक्के EPF सरकारकडून देण्यात येणार आहे. संकटाच्या या प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या हाती पैसे राहावेत या उद्देशाने पीएफ योगदान आहे, बारा टक्क्यांहून कमी करत पुढील तीन महिन्यांसाठी दहा टक्के करण्यात आले आहे.
ईपीएफच्या मागोमाग सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या नव्या आर्थिक पॅकेजमध्ये टीडीएस दरात कपात करण्यात आल्याचीही घोषणा करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२०-२०२१ साठी टीडीएस दरात २५ टक्क्य़ांची कपात करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
- इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढवली
- NBFC साठी ३० हजार कोटींची लिक्विडिटी योजना
- पुढच्या तीन महिन्यांपर्यंत देणार योगदान
- EPF मध्ये सरकार देणार २४ टक्के योगदान
- २०० कोटींपर्यंत ग्लोबल टेंडर नाही
- MSME ना मिळणार विनातारण कर्ज
- सेवा क्षेत्रातील उद्योग देखील लघु उद्योगात येणार, लघु उद्योगाची व्याख्या बदलली
- ३१ ऑक्टोबरपर्यंत कर्ज घेण्याची मुभा
- ४ वर्षात करता येणार कर्जाची परतफेड
- मध्यम, सूक्ष्म, कुटीर आणि लघु उद्योग मिळणार तारण विरहीत कर्ज
- जनधन खात्यात थेट निधी पाठविण्यात आला
- कुटीर, लघु उद्योगांसाठी पॅकेज दिले जाणार
आत्मनिर्भर भारत योजना, थोडक्यात आढावा
- देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी पंतप्रधानांनी व्हिजन समोर ठेवले
- आवास आणि उज्ज्वल योजनेतून गरीबांना होत आहे मदत
- रोज वेगवेगळ्या सेक्टरबाबत आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत
- लँड, लेबर आणि लिक्विडिटीवर विशेष भर देणार
- लोकल ब्रँड्सना ग्लोबल बनवण्याचे लक्ष्य