बॉलिवूडच्या या अभिनेत्याला देखील झाली होती कोरोनाची लागण
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून, गायिका कनिका कपूरनंतर आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे. रॉक ऑन, वो लम्हें आणि एअरलिफ्ट सारख्या चित्रपटांमध्ये काम केलला अभिनेता पूरब कोहलीने आपल्याला व कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती, अशी माहिती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. पूरब कोहली सध्या आपल्या कुटुंबियासोबत इंग्लंडमध्ये आहे.
पूरब व त्याचे कुटुंब मागील दोन आठवड्यांपासून लंडनमध्ये सेल्फ आयसोलेशनमध्ये राहत आहे. त्याने सोशल मीडिया पोस्टद्वारे माहिती शेअर केली की, त्यांच्या जनरल फिजिशियनने सांगितले की त्याला व कुटुंबाला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. सुरूवातीला सर्वांना सर्वसाधारण फ्लूप्रमाणेच लक्षण होते, मात्र नंतर समजले की सर्वजण कोरोना व्हायरसने संक्रमित आहेत.
पूरबने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, सर्वात प्रथम माझी मुलगी इनायाला कोरोना झाला. तिला थोडाफार कफ आणि सर्दी होती. मात्र ती एकादिवसात बरी झाली. त्यानंतर मला देखील कफ झाला, हे तीन दिवस सुरू होते. सर्वांचे तापमान 100-101 होते. मात्र ओसियनला तीन दिवस 104 फिव्हर होता. तिचे नाक वाहत होते व खोकला होता. पाचव्या दिवशी मात्र त्याचा ताप गेला.
त्याने सांगितले की, आता त्याच्या कुटुंबाला संक्रमण नाही. मागील बुधवारी त्यांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे. या लक्षणांमधून बाहेर येण्यासाठी घरगुती उपचार देखील घेतल्याचे त्याने सांगितले.
त्याने पोस्टमध्ये सांगितले की, आम्ही दिवसातून 4 ते 5 वेळा वाफ घ्यायचो. दररोज मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करायचो. आले, हळद आणि मधाचे मिश्रण करून घेतल्याने खूप मदत मिळाली. कोमट पाण्याची बाटली छातीवर ठेवल्याने देखील छातीला आराम मिळत असे. गरम पाण्याने आंघोळ केल्याने देखील फायदा झाला व याशिवाय आराम केल्याने दोन आठवड्यानंतर आम्ही यातून बरे होत असे वाटत आहे.
https://www.instagram.com/p/B-rQrT4jCUW/