टीम पेनच्या त्या आव्हानाला विराटचे प्रत्युत्तर; म्हणाला

Thote Shubham

ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया भारताविरुद्ध (India vs Australia) 3 सामन्यांची वनडे मालिका (3 Matches of ODI Series) खेळणार आहे. त्यातील पहिला सामना आज (14 जानेवारी) वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium), मुंबई येथे पार पडणार आहे. परंतु त्यापूर्वी ऑस्ट्रेलियासाठी एक आनंदाची बातमी आहे.

 

ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने (Tim Paine) भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) दिवस- रात्र कसोटी (Day- Night Test Match) सामना खेळण्याचे आव्हान दिले होते. हे आव्हान विराटने स्विकारले आहे. पेनला प्रत्युत्तर देताना विराट म्हणाला की, सामना कोणत्याही मैदानावर खेळवण्यात येवो त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही.

 

“या आव्हानासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. जरी हा सामना गाबा किंवा पर्थच्या मैदानावर असो आम्हाला फरक पडत नाही. आता आमच्या संघाकडे कोणत्याही क्रिकेट प्रकारात, जगातील कोणत्याही कोपऱ्यात, कोणत्याही संघाविरुद्ध खेळण्याची क्षमता आहे,” असे टीम पेनला प्रत्युत्तर देताना विराट म्हणाला.

 

काही महिन्यांपूर्वी भारताने बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळला होता. आता यानंतर विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध गुलाबी चेंडूने दिवस- रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

“आम्ही दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. ज्याप्रकारे हा सामना झाला त्यामुळे आम्ही आनंदी आहोत. दिवस-रात्र कसोटी सामना हा आता कोणत्याही कसोटी मालिकेचा चांगला भाग बनला आहे. त्यामुळे आम्ही दिवस-रात्र कसोटी सामने खेळण्यासाठी तयार आहोत,” असे पत्रकार परिषदेत विराट म्हणाला.

 

झाले असे की गाबा येथील मैदानावर पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन म्हणाला होता की, भारताने आमच्याविरुद्ध गुलाबी चेंडूने दिवस-रात्र कसोटी सामना गाबा या मैदानावर खेळावा. विशेष म्हणजे, गाबा मैदानावर ऑस्ट्रेलिया मागील 3 दशकांपासून एकही सामन्यात पराभूत झालेला नाही.

 

विशेष म्हणजे, 2018-19 या दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताला दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्यासाठी विनंती केली होती. परंतु तेव्हा विराटच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने याला नकार दिला होता.

Find Out More:

Related Articles: