मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यातील साखर उद्योगांना आर्थिक मदत करण्याची मागणी केली आहे. यावरुन निलेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली होती.
निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, असा टोला रोहित पवार यांनी निलेश राणेंना लगावला आहे.
मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत, असं ट्विट रोहित पवारांनी केलं आहे. दरम्यान, साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले यावर ऑडिट झालंच पाहिजे.
साखर कारखाने कोट्यवधींची उलाढाल करतात. राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षोंनवर्षे साथ देत आलेत. तरी वाचवा?, असं म्हणत राणे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती.