3 मेनंतर रेड झोन वगळता इतर ठिकाणी मोकळीक देणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनच्या अटी शिथिल करण्याविषयी दिलासादायक माहिती दिली. 3 मेनंतर राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे तसेच रेड झोन वगळता इतर झोनमध्ये परिस्थिती पाहून आतापेक्षा अधिक मोकळीक देण्यात येणार आहे. लॉकडाऊनमध्ये अधिक शिथिलता दिली जाईल, असं सांगतानाच पण ही शिथिलता देताना कोणतीही घाईगडबड करण्यात येणार नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. तुम्हीही मोकळीक दिल्यानंतरही काळजी घ्यायची आहे. नाही तर आजवर केलेल्या तपश्चर्येवर पाणी फिरेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांविषयीही भाष्य केले. शेती-शेतकऱ्यांवर कोणतंही बंधन नसतील. बी बियाणे, शेती जशी चालू आहे, तशीच चालू राहील. मालवाहतूक सुरु करण्यात आली आहे. हळूहळू बंधनं शिथिल करत आहोत. पण झुंबड झाली तर पुन्हा बंधनं टाकावी लागतील. ग्रीन झोन, ऑरेंज झोन आणि रेड झोन आहेत. रेड झोनमध्ये काळजी घ्यावी लागेल. रेड झोनमध्ये शिथीलता शक्य होणार नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.