विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुका जाहीर करा, राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र

Thote Shubham

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवर अजूनही काळे ढग फिरत असताना, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणूका जाहीर करा अशी विनंती निवडणूक आयोगाकडे केली आहे.


राज्यातील असलेली अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागांसाठी निवडणूक घ्यावी, असे राज्यपालांनी आयोगाला सांगितले आहे. राज्यपालांनी याबाबत एक पत्र आयोगाला पाठवले आहे.

 

राज्यपालांनी या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारने देशात लॉकडाउनच्या अंमलबजावणी संदर्भात काही निर्णय शिथिल करण्याचा निर्णय घेतला, त्या अनुषंगाने काही विशिष्ट मार्गदर्शक सूचनांसह परिषदेच्या रिक्त जागांवर निवडणुका होऊ शकतात, असे ते म्हणाले.
                                  

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विधिमंडळाच्या एकाही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना येत्या २८ मेच्या आधी याबाबतची पूर्तता करावी लागणार आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानंतर राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयच्या जागेसाठी मंत्रिमंडळाने उद्धव यांच्या नावाची शिफारस राज्यपालांकडे केली आहे.

 

९ एप्रिलला ही शिफारस करण्यात आली असताना त्यावर राज्यपालांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलेली विनंती फार महत्त्वाची ठरली आहे.

 

Find Out More:

Related Articles: