
उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद धोक्यात?
मुंबई : जगभरातील बहुतांश देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसने आपल्या देशासह महाराष्ट्रातही धुमाकूळ घातला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली असताना अशा स्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यातील लोकांना वारंवार संयमाचे पाळण्याचे आवाहन करतच आहेत.
त्याचबरोबर कठोर निर्णयही घेत आहेत. पण राज्यावर हे कोरोनाचे संकट असतानाच उद्धव ठाकरेंसमोर थेट मुख्यमंत्रिपद जाण्याचाच धोका निर्माण झाला आहे.
एप्रिल महिन्यात होणारी राज्यातील विधानपरिषदेची निवडणूक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. राज्य विधानपरिषदेच्या 9 जागा येत्या 24 एप्रिल रोजी रिक्त होत आहेत. या निवडणुकीत विधानसभेतील आमदार मतदान करतात. पण ही निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेऊन केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीची तारीख नंतर जाहीर करणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमोर या स्थितीमुळे नवा पेच निर्माण झाला आहे. कारण विधानपरिषद किंवा विधानसभा अशा कोणत्याही सभागृहाचे उद्धव ठाकरे हे सदस्य नाहीत. असे असताना मुख्यमंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली होती. मुख्यमंत्रिपदावर कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ राहता येत नाही. 28 मे रोजी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीला 6 महिने पूर्ण होत आहेत. त्यामुळे संवैधानिक पेच निर्माण झाला आहे. कारण निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याने उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर निवडणूक जाऊ शकत नाहीत. अशा स्थितीत उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, विधानपरिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतरही याआधी दीपक सावंत आणि फौजिया खान या पुढील 6 महिने मंत्रिपदावर कायम राहिल्या होत्या. पण हे दोघेही आधी सभागृहाचे सदस्य असल्याने त्यांना कार्यकाळ वाढवून मिळाला होता. पण उद्धव ठाकरे हे कधीही कोणत्याच सभागृहाचे सदस्य राहिले नसल्याने पेच निर्माण झाला आहे.