मोदी म्हणाले देशद्रोह्यांना मतदान करु नका, दिल्लीकरांनी ऐकलं, भाजपला नाकारलं - नवाब मलिक
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिल्ली निकालावरुन भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशद्रोह्यांना मतदान करु नका, ते दिल्लीच्या जनतेने ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारलं, असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला. भाजपने हजारो कोटी वाटूनही त्यांना विजय मिळवता आला नाही. जनतेने भाजपला त्यांची जागा दाखवली असं
हरल्यानंतर नवाब मलिक म्हणाले.
दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. मात्र सकाळी दहावाजेपर्यंत आलेल्या कलानुसार इथे आपने 50 जागांवर आघाडी मिळवत, बहुमताचा आकडा पार केला. तर भाजपला 20 जागांपर्यंतच आघाडी घेता आली. या निकालावर प्रतिक्रिया देताना नवाब मलिक म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की देशद्रोह्यांना मतदान करु नका, ते दिल्लीच्या जनतेने ऐकलं आणि देशद्रोही भाजपला नाकारलं.
दिल्लीकरांनी भाजपला देशद्रोही घोषित केलं. जनतेला जो सल्ला दिला होता तो जनतेने ऐकला. भाजपने दिल्लीत धार्मिक तेढ निर्माण केला. शाहीनबाग प्रकरणी देशद्रोही ठरवलं. भाजपचे ‘चाणक्य’ अमित शाहांच्या 40 सभा झाल्या, 270 खासदार प्रचारात होते. अनेक आजी-माजी मुख्यमंत्री दिल्लीत तळ ठोकून होते. हजारो कोटी रुपये खर्च केले. मतदारांना पैसे वाटताना भाजपवाल्यांना पकडलं, तरीही भाजपचा पराभव झाला” यापुढे बिहार, उत्तर प्रदेशसह सर्वच राज्यातून भाजप हद्दपार होईल, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.