
हीच व्यक्ती राजकारणातील चाणक्य आणि चंद्रगुप्तही - नाना पाटेकर
पुणे : पिंपरी चिंचवड येथे ज्येष्ठ राजकीय नेते आणि राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांची प्रशंसा करत त्यांना सिने अभिनेते नाना पाटेकर यांनी लक्षवेधी उपमा दिली आहे. गेल्या ५० वर्षांत राजकारणात कॅन्सरसारख्या आजाराला परतवून लावणाऱ्या पवार यांनी चंद्रगुप्त तयार केला नाही. कारण, अशी बाब लक्षात येत आहे की खुद्द शरद पवार हेच चंद्रगुप्तही आहेत आणि चाणक्यही असल्याचे नाना पाटेकर यांनी म्हटले आहे.
आपले शरद पवार हेच हिरो होते, असे सांगत हा माणूस कायमच महाराष्ट्रासाठी काहीतरी करेल असे वाटत असायचे. पक्ष वगैरेची येथे गोष्टच नसून पवारांना आपणच एकदा ते राजकारणातील चाणक्य असल्याचे सांगितले होते, असे नाना म्हणाले. शरद पवारांना राजकारण कसे करावे हे चांगलेच ठाऊक असल्याची बाबही नानांनी त्यांना सांगितली होती.
पण, सोबतच गेल्या ५० वर्षांत त्यांनी एकही चंद्रगुप्त तयार केला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. नानांची ही खंत फार काळ टीकू शकली नाही. कारण, शरद पवार हेच चंद्रगुप्त आणि हेच चाणक्य असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. कॅन्सरसारख्या आजारालाही जो माणूस परतवून लावतो, त्याच्यापुढे इतरांचे काय म्हणत पवारांच्या जिद्दीला नानांनी दाद दिली.
सर्वसामान्य माणूस आणि दंगलीचे वातावरण यावरही नाना पाटेकर यांनी यावेळी भाष्य केले. मुळात व्यक्त न होणे हाच गुन्हा असल्याचे म्हणत सामान्य जनता ऐकते, सहन करते पण त्यावर प्रश्न मात्र उपस्थित करत नाही, ही वस्तूस्थिती पाटेकर यांनी सर्वांपुढे मांडली. सहनशीलतेचा हाच उद्रेक दंगलीच्या वेळी होतो, कारण तेव्हा साचलेल्या सर्व भावना, आक्रोश यांचा भडका उडतो, ही बाब त्यांनी अधोरेखित केली.