जे काही आज घडले ते देशासाठी अत्यंत भयानक – मनेका गांधी

Thote Shubham

नवी दिल्ली – हैदराबाद चकमकीवर भाजप खासदार मनेका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या घटनेला अत्यंत भयानक म्हटले आहे. त्याचबरोबर कायदा तुम्ही हातात घेऊ शकत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. पोलीस चकमकीत हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी ठार झाले आहेत.

 

आरोपींना पोलिसांनी तपासासाठी घटनास्थळी नेले असता पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पोलिसांनी यावेळी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केले. पोलिसांच्या चकमकीनंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून पोलिसांच्या कारवाईचे काहीजण कौतुक करत आहेत तर काहीजण विरोध दर्शवत आहेत.

 

चकमकीवर बोलताना मनेका गांधी यांनी सांगितले आहे की, जो काही प्रकार आज सकाळी झाला तो देशासाठी अत्यंत भयानक आहे. कायदा तुम्ही हातात घेऊ शकत नाही. त्यांना न्यायालयाने अशीही फाशीची शिक्षा सुनावली असती. तर तुम्ही न्यायालयीन प्रक्रिया सुरु होण्याआधीच गोळी चालवणार असाल, तर मग न्यायालय, कायदा आणि पोलीस असण्याचा अर्थ काय? या घटनेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली असून चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचे म्हटले आहे. या घटनेनंतर द्विधा मनस्थिती आहे. बलात्कारी ठार झाल्याचा आनंद आहे, परंतु कायदेशीर मार्गाने फाशी व्हायला पाहिजे होती. चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.                                     

Find Out More:

Related Articles: