तर आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ - सदाभाऊ खोत
‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि माझ्यात वाद असेल. तर तो आपल्या पुरता असावा. पण शेट्टी हे विनाकारण माझ्या कुटुंबियांना मध्ये घेत आहेत. जर आमच्या विरोधात पुरावे असतील तर पोलिसांना द्या. आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार आहे,’ असे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडल्यापासून काही लोकं माझं राजकीय आयुष्य संपवण्याचं कट कारस्थान करत आहेत. कडकनाथ घोटाळा प्रकरणात आमच्या विरोधात पुरावे द्यावेत, आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ,’ असे ते यावेळी बोलताना म्हणाले.
तसेच पुढे बोलताना खोत म्हणाले, ‘काही हितचिंतक आहेत. त्यांना वाटते की आम्ही तुरुंगात गेलो पाहिजे. आम्ही 30 वर्षापासून तुरुंगाच्या वारी केल्यात तुरुंगात जाण्याची चिंता आम्हाला नाही. पण खोटे आरोप करून पोळी भाजू नका,” अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली.
दरम्यान, कडकनाथ कोंबडी संस्थेशी आमच्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती संबंधित नाही. काही लोक सदाभाऊ यांना राजकारणातून संपवण्याच्या उद्देशाने आंदोलन करत आहेत. मात्र त्या प्रकरणाशी आमचा संबंध नाही. अशा पद्धतीने अडवून एखाद्या प्रकरणाची भीती घालून जर कोणी मला थांबवायचा प्रयत्न करत असेल, तर आम्ही थांबणाऱ्यांपैकी नाही, असे ते म्हणाले.