छत्रपतींचे नाव घेणे हा गुन्हा असेल तर तो पुन्हा पुन्हा करायला मी तयार आहे - उद्धव ठाकरे

Thote Shubham

 महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेतील आपल्या पहिल्याच भाषणात विरोधकांना फटकारले. छत्रपतींचे नाव घेणे हा गुन्हा असेल तर तो पुन्हा पुन्हा करायला मी तयार आहे. आपले दैवत, आईवडिलांना जो मानत नाही, त्याला जगण्याचा हक्क नाही. हा कारभार आपण ज्यांची शपथ घेऊन सुरू करत आहोत त्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र आम्ही घडवू, अशी ग्वाही दिली आहे.

उद्धव यांनी आपल्या भाषणाला ‘शिवरायाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आभार…’अशा शब्दांत सुरुवात केली. ते म्हणाले, मी या सभागृहात आयुष्यात पहिल्यांदाच आलो आहे. सभागृहात आलो हे माझे भाग्य असून छत्रपती शिवरायांना येताना वंदन करू आलो. हा महाराष्ट्र छत्रपतींचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहे. ज्या मातीत हे दैवत जन्माला आले त्या मातीत जन्माला आलेले आपण सारे शिवभक्त आहोत.

माझ्यासमोर या सभागृहात वागायचे कसे, हा प्रश्न होता. कारण मी मैदानातला माणूस, मला वैधानिक कामाचा अनुभव नाही. पण येथे आल्यावर असे वाटते की यापेक्षा आपले मैदानात बरे असते. मी मोकळ्या बाकांशी आज लढणार नाही. मी मोकळ्या मैदानात तलवारबाजी करणारा नाही. शत्रूला अंगावर घेणारा मी आहे.

मी या सभागृहात आल्यानंतर फुले, शाहू, आंबेडकरांच्या तसबिरी पाहिल्या. हा महाराष्ट्र छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांचा असे आपण केवळ भाषणात म्हणायचे आणि प्रत्यक्षात या महापुरुषांचा आदर ठेवायचा नाही, याला काय अर्थ? केवळ छत्रपतींचे नाव घेऊन शपथ घेतली तर यांना इंगळ्या डसाव्या? हो, मी छत्रपतींची शपथ घेतली आणि ती मी पुन्हा घेईन, मी माझ्या आईवडिलांची शपथ घेतली, मी पुन्हा घेईन. छत्रपतींचे नाव घेणं हा गुन्हा असेल तर मी तो एकदा नाही, दहादा नाही, प्रत्येक जन्मात करीन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठासून सांगितले.

 

Find Out More:

Related Articles: