बाबा, आम्ही करून दाखवलं!; रितेश देशमुखचं भावूक ट्विट

Thote Shubham

राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे दोघेही विधानसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांचा भाऊ बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानं भावूक ट्विट केलं आहे. ‘बाबा, आम्ही करून दाखवलं,’ असं रितेशनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. विलासराव देशमुख यांचा राजकीय वारसा ते पुढे नेत आहेत. या निवडणुकीत विजय मिळवून त्यांनी हे दाखवून दिलं आहे. अमित देशमुख हे लातूर शहर मतदारसंघातून 42 हजारांहून अधिक मतांनी निवडून आले आहेत. ते तिसर्‍यांदा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख हे 1 लाख 20 हजार मतांच्या मोठ्या फरकानं विजयी झाले आहेत.

दोन्ही भाऊ विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख यानं भावूक ट्विट केलं आहे. ‘बाबा, आम्ही करून दाखवलं,’ असं ट्विट त्यानं केलं आहे. तसंच लातूरच्या मतदारांनी आमच्यावर विश्‍वास दाखवला त्याबद्दल आभार, असं त्यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आलेले अमित देशमुख तिसर्‍यांदा विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे उमेदवार शैलेश गोविंदकुमार लाहोटी यांचा दणदणीत पराभव केलाय.

2014मध्ये अमित यांना 119656 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांचा पराभव केला होता. लाहोटी यांना 70191 मते मिळाली होती. त्याआधी 2009मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अमित यांना 113006 मते मिळाली होती. तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बसपाचे मोहम्मद खान पठाण यांना 23526 मते मिळाली होती. तर लातूर ग्रामीणमधून पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांनी तब्बल सव्वा लाखांचं मताधिक्य घेत प्रतिस्पर्धी उमेदवार सचिन देशमुखांचा पराभव केला आहे.

माजी राज्यमंत्री दिलीप देशमुख, विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशाली देशमुख, अमित देशमुख, अदिती देशमुख, अभिनेता रितेश देशमुख, तसंच अभिनेत्री आणि रितेश देशमुख याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी या दोघांच्याही प्रचारासाठी लातूरमध्ये तळ ठोकला होता. रितेश देशमुख यांनी तर भाऊ धीरजसाठी फिल्मी स्टाइलने मते मागितली होती. राज्याच्या विधानसभेत विलासरावांचा वारसा चालवणार्‍या अमित देशमुखांबरोबर आता धीरज यांच्या रुपाने आणखी एक देशमुख दाखल होणार आहे.

Find Out More:

Related Articles: