
शरद पवारांवरील कारवाईशी सरकारचा संबंध नाही - मुख्यमंत्री
राज्यात युतीच जिंकणार असल्याने शरद पवार यांना गोवण्याची सरकारला गरज नाही. असले हातखंडे जिंकणारा कधीही वापरत नसतो, हे राजकारण समजणारा कोणीही सांगू शकतो, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
ईडीने शिखर बॅंक घोटाळ्याबाबत केलेल्या कारवाईशी राज्यसरकारचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे सरकारने सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रश्नच येत नाही. या कारवाईत कोणतेही राजकारण झालेले नाही, असे फडणवीस म्हणाले. ते म्हणाले, उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घोटाळ्यात कुणाची काय भूमिका आहे याची चौकशी सुरू आहे.
100 कोटींपेक्षा जास्त मोठ्या घोटाळ्यात ईडी तपास करते. त्यात राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतोच. न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई सुरू आहे. त्यात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाही. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नसतील त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असे ते म्हणाले.