शिवसेना- भाजपची युती होवो अथवा न होवो. आपण निवडणुकीसाठी तयारी केली आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा दावा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी केला.
राज्यात शिवसेना, भाजप युतीची चर्चा सुरु आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या मतदारसंघात देखील निवडणूक तयारीवर भर दिला आहे. इगतपुरी आणि देवळाली या शिवसेनेच्या मतदारसंघात त्यांनी मेळावे घेतले. हा मतदारसंघ सलग तीस वर्षे शिवसेनेकडे असुन योगेश घोलप हे येथील विद्यमान आमदार आहेत. यावेळी हंसराज अहिर म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या योजना व पक्षाचे विचार तळागाळातील नागरिकांपर्यंत पोचवून पक्षाच्या भक्कम बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी मेहनत घ्यावी.
विकास हवा तर भाजपला पर्याय नाही, असे आवाहनही त्यांनी केले. या मेळाव्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत अस्वस्थता तर भाजपच्या निवडणुकीची तयारी करणाऱ्या नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी भाजपच्या उमेदवाराला संधी मिळावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
देवळाली विधानसभा मतदारसंघात युती झाल्यास तो उमेदवार निवडून आणण्यासाठी मेहनत घेऊ, न झाल्यास भाजपच्या उमेदवाराला मताधिक्याने विजयी करण्यासाठी जिवाचे रान करू, असा शब्द कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, बापू पाटील, भगवान कटारिया, सचिन ठाकरे, बाबूराव मोजाड, प्रीतम आढाव, सरोज अहिरे, तानाजी करंजकर, शहराध्यक्ष जीवन गायकवाड आदी उपस्थित होते.