अखेर काँग्रेसच्या नांदेड जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनीही दिले राजीनामे

     लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे देशातील सर्वच काँग्रेस नेत्यांनी मंथन करुन आणि जबाबदारी स्वीकारुन आपल्या पदाचा राजीनामे दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनीही जिल्ह्यात काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन आपले राजीनामे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सोपविले आहेत. 
     नांदेड लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. काँग्रेसचा हा बालेकिल्ला भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतला. काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. या पराभवानंतर पदाधिकाऱ्यांनी मंथन केले. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला.
     नांदेड जिल्हा काँग्रेसमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे मंथन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर आणि काँग्रेसचे आमदार आणि नांदेड महानगर अध्यक्ष अमर राजूरकर यांनी आपल्या पदाचा शुक्रवारी राजीनामा दिला. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील 16 तालुकाध्यक्षांनी तसेच सिडको, तरोडा ब्लॉक यांच्या अध्यक्षांनीही अशोक चव्हाण यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले.
     काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा ते स्वीकारणार की नाही याबद्दल अनेक तर्कवितर्क करण्यात येत आहेत. अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देताना काँग्रेस पक्षात आमूलाग्र बदल करणे आवश्यक असून त्यासाठी आपण राजीनामा देत आहोत, असे सांगितले होते.
     नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा काँग्रेस समितीची पुनर्रचना करण्यास सोपे जावे यासाठी राजीनामा देत असल्याचे सांगितले. काँग्रेसचे मराठवाडा प्रवक्ते संतोष पांडागळे या राजीनाम्याबद्दल बोलताना म्हणाले की, काँग्रेस पक्षाची पुनर्बांधणी करणे आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष संघटना मजबूत करणे हा राजीनाम्याचा हेतू आहे.

Find Out More:

Related Articles: