प्रेक्षकांचा निरोप घेणार अमोल कोल्हेंची लोकप्रिय मालिका

Thote Shubham

२५ सप्टेंबर २०१७ पासून प्रेक्षकांच्या भेटीला ‘झी मराठी’ वाहिनीवर बऱ्याच काळानंतर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका आली. मालिकेत संभाजीराजांचे रुप, त्यांचा इतिहास कसा दाखवला जाईल, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात पिंगा घालू लागले होते. पण ही मालिका जेव्हा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हा त्याला लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले. पण आता लवकरच ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मालिकेचा शेवटचा एपिसोड फेब्रुवारी महिन्यातच प्रसारित होणार आहे.

 

अत्यंत रंजक या मालिकेचा शेवट असणार आहे. निर्माते-दिग्दर्शक दोन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या मालिकेचा शेवट अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. टीआरपीच्या यादीतही या मालिकेने टॉप ५ मध्ये आपली जागा मिळवली होती. मालिकेने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ५०० एपिसोड पूर्ण केले होते.

 

या मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अमोल कोल्हे यांनी एका मुलाखतीत ही मालिका इतिहासाला कुठेही गालबोट न लागता प्रेक्षकांसमोर सादर करणे आणि संभाजी महाराजांची ओळख आजच्या तरुणाईला करून देणे याचे भान ठेवत ही मालिका केली असल्याचे सांगितले होते. संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर या मालिकेतून प्रकाश टाकण्यात आला.

 

संभाजी यांची डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली भूमिका, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची शंतनू मोघे यांनी साकारलेली भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसुबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. या मालिकेची जागा कुठली मालिका घेणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

 

Find Out More:

Related Articles: