अंकुश-शिवानीच्या ट्रिपल सीटचा ट्रेलर रिलीज
मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार अंकुश चौधरी बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण यावेळी तो काही एकटा येत नाही आहे. तर त्याच्यासोबत दोन अभिनेत्री देखील येत आहेत. त्या म्हणजे बिग बॉस मराठी फेम शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ट्रिपल सीट असे आहे.
मध्यंतरी चित्रपटाचे पोस्टर भेटीला आले आणि त्यानंतर काही दिवसांनी चित्रपटाच्या टीझरमधून चित्रपटाची झलक दिसली. चित्रपटाची कास्ट पहिल्याच पोस्टरमध्ये समजली आणि चित्रपटाची बरीच चर्चा रंगली. अखेर चित्रपटाचा ट्रेलर भेटीला आला आहे आणि यातून दिवाळीत उलगडणाऱ्या अंकुश–शिवानी–पल्लवी यांच्या मिसकॉलवाल्या मैत्रीचे रहस्य उलगडणार असे स्पष्ट होत आहे.
चित्रपटाची टॅगलाईनच खूप आकर्षक आहे आणि चित्रपटाची वन लाईन थोडक्यात सांगून जाते. ‘गोष्ट वायरलेस प्रेमाची’ अशी टॅगलाईन असल्याने फर्स्ट लूकपासून चर्चेत असलेल्या हा आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दिमाखदार सोहळ्यात, हटके अंदाजात लाँच करण्यात आला. कृष्णा म्हणजेच अंकुश चौधरी आपल्या तीन मित्रांसह कुणाच्या तरी घरात डोकावताना ट्रेलरमध्ये दिसतो आहे.
तसेच शिवानी सुर्वे अर्थात मीराचा मिसकॉल त्याच्या मोबाईलवर येतो. ती नेमकी कोण आहे हे त्याला माहीत नाही, पण त्यांच्यात मिसकॉलवाली मैत्री होते. त्यांच्यातील नाते हळू-हळू खुलू लागते असे दिसते. आता मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक त्यांच्यात होत आहे का असे वाटत असताना चित्रपटाच्या या ट्रेलरमध्ये एक ट्विस्ट येतो.
पल्लवी पाटील म्हणजेच वृंदाची ट्रेलरमध्ये एन्ट्री होते. कृष्णा आणि वृंदा एकमेकांना कधीच सोडून न जाण्याचे वचन देताना दिसतात. त्यांच्यात देखील एक वेगळे नाते आहे हे दिसून येते. त्यामुळे बरेच प्रश्न आणि चित्रपटाबद्दल कुतूहल सुद्धा निर्माण होते. शिवाय, प्रविण विठ्ठल तरडे इन्स्पेक्टर दिवानेच्या भूमिकेत आहेत. त्यांची व्यक्तीरेखा कृष्णाच्या आयुष्यातील गुंता सोडवतात की वाढवतात हे बघणे सुद्धा औत्सुक्याचे ठरणार आहे.
ट्रेलरच्या शेवटी अंकुश एका मुलीच्या हातात अंगठी घालताना दिसतो, हा हात नेमका कुणाचा आहे? हे आणि ट्रेलर बघून पडलेले अजून प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी यंदाच्या दिवाळीपर्यंत मात्र वाट पहावी लागणार आहे. एका मिसकॉलने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतील तर जगातील सर्वांनी आपल्या जवळच्या मित्राला मिसकॉल मारावा, असे सांगणारा संकेत पावसे दिग्दर्शित ट्रिपल सीट हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.