चक्क 13 वर्षांच्या मुलाने बनवली इलेक्ट्रिक कार
उत्तराखंडच्या भूपतवाला येथे राहणारा 13 वर्षीय विद्यार्थी कन्हैया प्रजापतीने बॅटरीवर चालणारी कार बनविण्याचा कारनामा केला आहे. रस्त्यावर धावताना ही कार लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
कन्हैयाने ही कार तयार करण्यासाठी कोणाचेच मार्गदर्शन घेतले नाही. केवळ आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याने ही कामगिरी केली. अडचण आल्यावर त्याने युट्यूबची मदत घेतली. 8वीच्या वर्गात शिकणार कन्हैया दिवसभर शाळेतून आल्यानंतर मिळणाऱ्या वेळेत काहीतरी नवीन बनविण्याचा प्रयत्न करत असतो. त्याने इलेक्ट्रिक रोबॉट, हायड्रोलिक जेसीबी, इलेक्ट्रिक रिमोट कंट्रोल कार, इलेक्ट्रिक सायकल देखील बनवली आहे.
आता दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर त्याने इलेक्ट्रिक कार तयार केली आहे. ही कार बॅटरीवर चालते. याची लांबी जवळपास 5 फूट 5 इंच आणि रुंदी 2 फूट 5 इंच आहे. तर उंची 4 फूट 6 इंच आहे. यामध्ये एलईडी लाइट, इंडीकेटर, हॉर्न, आरसा देखील लावला आहे.
ही कार देखील चावीनेच सुरू होते. कन्हैयानुसार, यात 230 वॉटच्या 4 बॅटरी लावण्यात आलेल्या आहेत. गाडीच्या बॉडीचे डिझाईन प्लायवूडने केलेले आहे. आपल्या पॉकिट मनीमधून वाचलेल्या पैशातून ही कार त्याने तयार केली आहे. त्याला वैज्ञानिक बनून देशाची सेवा करायची आहे.