
शत्रूचा नायनाट करणारे अपाचे ए एच ६४ हेलिकॉप्टर्स वायुसेनेच्या ताफ्यात दाखल
अमेरिकी बनावटीची अपाचे ए एच ६४ हेलिकॉप्टर्स आज भारतीय वायुदलात सामील करण्यात आली. आज सकाळी पंजाबात पठाणकोट इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या एका कार्यक्रमात वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी.एस.धनोआ यांच्या उपस्थितीत ही आठ हेलिकॉप्टर्स वायूसेनेत दाखल झाली. यामुळे वायूसेनेची ताकद वाढल्याचा विश्वास धनोआ यांनी व्यक्त केला.
भारतीय वायुसेनेनं २०१५ मध्ये अमेरिका सरकार आणि बोइंग कंपनी सोबत २२ हेलिकॉप्टर खरेदी करण्यासंदर्भात करार केला आहे. दरम्यान,जवळपास 280 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेणारं हे हेलिकॉप्टर त्याच्या डिझाइनमुळे रडारमध्ये सहजपणे दिसत नाही.
जवळपास पावणे तीन तासांपर्यंत हवेत राहू शकणाऱ्या या हेलिकॉप्टरने दशहतवाद्याचं तळ असो किंवा लढाऊ टँक सर्व उद्ध्वस्त करता येणं शक्य आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये असते.
भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात या लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश करण्यात आला आहे. एकूण आठ लढाऊ हेलिकॉप्टर आहेत. टप्प्याटप्प्याने आणखी २२ लढाऊ हेलिकॉप्टर हवाई दलात दाखल होतील. सर्वात शक्तिशाली आणि अचूक मारा करण्याची क्षमता या लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये आहे.