
पाकिस्तानमधून जातो भारताच्या प्रगतीचा मार्ग – शोएब अख्तर
नवी दिल्ली – आपल्या शेजारील देशासोबत असलेल्या संबंधांची माहिती सर्वच जगाला माहित आहेत. त्यातच आपल्या देशात होणाऱ्या दहशतवादी कृत्यांना पाकिस्तानातूनच खतपाणी मिळत असल्याचे अनेक वेळा उघडकीस आल्यामुळे पाकिस्तानसोबत असलेले सर्वच संबंध भारताने तोडले आहेत.
दहशतवादाला घेऊन पाकिस्तानबरोबर असलेल्या राजकीय मतभेदासोबतच उभय देशांमध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिकाही बंदच आहेत. दोन्ही संघ केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेत एकमेकांना भिडतात. हे संघ नुकत्याच पार पाडलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका व्हावी, अशी इच्छा पाकिस्तानी खेळाडूंनी अनेकदा बोलून दाखवली आहे. पण आता त्यातच दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल माजी गोलंदाज शोएब अख्तरने मोठे वक्तव्य केले आहे.
शोएब अख्तर पाकिस्तानमधील एका चॅनलच्या चर्चा सत्रात बोलताना म्हणाला, भारत खुप सुंदर ठिकाण आहेत आणि तेथील माणसेही खूप चांगली आहेत. भारतातील लोकांना कधीही पाकिस्तानसोबत युद्ध व्हावे असे कधी वाटले नाही. पण, जेव्हा त्यांच्या टीव्ही चॅनेलमध्ये मी जातो, तेव्हा उद्याच दोन देशांमध्ये युद्ध होईल असे वाटते. संपूर्ण भारत मी फिरलो आहे आणि या देशाला मी जवळून पाहिले आहे.
त्यावरूनच मी ठामपणे म्हणू शकतो की, भारत पाकिस्तानसोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे. पाकिस्तानमधून भारताच्या प्रगतीचा मार्ग जातो, याची मला खात्री पटली आहे. दरम्यान आयपीएल कोरोना व्हायरसमुळे रद्द होण्याची शक्यता असून त्यावर अख्तरने नाराजी व्यक्त केली. त्याच्या यूट्युब चॅनलवर त्याने म्हटले की, मला आशा आहे की, हे नुकसान होणार नाही आणि आयपीएल स्पर्धा होईल, परंतु तसे न झाल्यास त्याला दुर्दैवच म्हणावे लागेल.