परिवहन खात्याकडून एस.टी.मध्ये मेगा भरती, जाहिरात देखील प्रसिद्ध

परिवहन खात्याकडून एस.टी. महामंडळामध्ये मेघा भारती होणार आहे. राज्य परिवहन महामंडळामध्ये ८०२२ चालक आणि वाहकांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री रावते यांनी विधानसभेत दिली.

यावेळी रावते म्हणाले की, राज्यातील बेरोजगार तरुण, विधवा महिला, हुतात्मा जवानांचे वारस, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस, दुष्काळग्रस्त भागाताली तसेच सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाने उपाययोजना केल्या आहेत. तसेच २०१६-१७ मध्ये चालक आणि वाहक पदाची चाचणी उत्तीर्ण असलेल्या ९४५ तसेच किरकोळ त्रुटीच्या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या आणि वाहन चाचणी उत्तीर्ण झालेल्या ८७८ अशा एकूण १८२३ उमेदवारांना कोकण प्रदेशांतर्गत विभागात सामावून घेण्यात येणार असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले.

दरम्यान महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २१ आदिवासी युवतींना एसटीमध्ये चालकपदी नियुक्ती देण्यासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण सुरु केले आहे. या प्रशिक्षणात युवतींना अटी आणि शर्तींमध्ये शिथिलता दिली असून प्रशिक्षणाच्या दरम्यान मोफत पास, गणवेश आणि विद्यावेतन दिले जाणार असल्याची माहिती रावते यांनी दिली.

Find Out More:

Related Articles: