दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा - मॅरेथॉनमध्ये ज्योती गवतेला कांस्यपदक
नेपाळ येथे सुरु असलेल्या तेराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत परभणीची आंतरराष्ट्रीय धावपटू ज्योती गवतेने 42 किलोमिटर अंतराच्या मॅरेथॉनचे कास्यपदक पटकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
नेपाळमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत शनिवारी (ता.7) मॅरेथॉन झाली. या स्पर्धेत मराठवाडा एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्योती गवतेने कास्यपदकला गवसणी घातली. आठ देशांच्या या स्पर्धेत भारताचा तिरंगा डौलाने फडकावला. ज्योतीने ही स्पर्धा 2:52:44 वेळेत पूर्ण करून कांस्यपदक पटकावले. श्रीलंकेच्या हिरुणी केसरा हिने सुवर्ण, नेपाळच्या पुष्पा भंडारीने रौप्य पदक पटकावले.
भारतीय संघातील जिग्मेट डोलमा हिने 3:07:24 मिनीटांची वेळ घेत पाचवे स्थान पटकावले. तिच्या या यशाबद्दल भारतीय पथकासोबत असलेले भारतीय आँलम्पिक महासंघाचे सरचिटणीस राजीव मेहता, भारतीय तलवारबाजी महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे,मध्यप्रदेश ऑलिम्पिंक संघटनेचे सचिव दिग्विजयसिंह यांनी ज्योतीचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
ज्योतीने कास्यपदक पटकावल्याची बातमी समजताच, परभणी जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ज्योतीवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जिल्हाधिकारी पी. शिवा शंकर, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बोकारीया यांसह क्रीडा क्षेत्रातील आदींनी तिचे कौतुक केले.
ज्योतीने आतापर्यंत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधत्व केले आहे. थायलंड, दक्षिण आफ्रिका, चीन या देशांत झालेल्या विविध स्पर्धांमध्ये भारताचे सहा वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळूरु, सुरत, दिल्ली येथे होणाऱ्या आंतराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धाही गाजवल्या आहेत. असे असले तरी शासन, महासंघ स्तरावर तिच्या वाटचालीची अद्याप दखल घेतलेली नाही.