
चार्ज न करताच चालणार ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार
सध्या इलेक्ट्रिक वाहनांना जगभरात प्रोत्साहन दिले जात असून अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वहाने बाजारात आणत आहेत. या सर्व इलेक्ट्रिक कार्सपेक्षा वेगळी, चार्ज करण्याची गरज नसलेली आणि एका चार्जमध्ये ८२० किमी अंतर तोडणारी एक खास स्पोर्ट्स कार लवकरच बाजारात दाखल होणार आहे. गंपर्ट आईवेज या नावाच्या कंपनीने ही कार तयार केली असून तिचे नामकरण नथाली असे केले आहे. ही कार मेथेनोलवर चालते. म्हणजे या कारमध्ये मेथेनोलचे विजेत रुपांतर केले जाते आणि कार विजेवरच चालते.
या कारमध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन दिले गेले आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक कार असूनही मोठी बॅटरी दिली गेलेली नाही. ही कार हायड्रोजन बनविण्यासाठी मेथेनोल फ्यूलसेलचा वापर करते व त्याचे विजेत रूपांतर करते. कार मध्ये १ बॅटरी आहे पण ती मेथेनोल फ्यूल सेल व चार मोटर्स मध्ये बफर म्हणून काम करते. चालकाला फ्यूल सेल पेक्षा जादा पॉवर हवी असेल तर ती या बॅटरी पॅक मधून पुरविली जाते.
ही कार सर्वसामान्य स्पोर्ट्स कार्सना सहज टक्कर देईल. ० ते १०० किमीचा वेग ती २.५ सेकंदात घेते तर तिचा सर्वाधिक वेग आहे ताशी २९६ किमी. ही कार तासंतास चार्ज करण्याची गरज नाही. ती अवघ्या ३ मिनिटात रीफ्युल होऊ शकते. कंपनी सध्या या कारची ५०० युनिट बनवीत असून ती जर्मनी, स्कँडेनेविया, स्विझर्लंड, पोलंड, बेल्जियम, लग्झम्बर्ग आणि नेदरलँड्समध्ये विकली जाणार आहेत. या कारची किंमत ३.४ कोटी रुपये असल्याचे समजते.
