
या भारतीय कंपनीने तयार केली कोरोनाची अँटीबॉडी किट
भारतसह जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने वाढत असून, दररोज शेकडो जणांचा यामुळे मृत्यू होत आहे. या व्हायरसच्या लसीवर जगभरातील वैज्ञानिक संशोधन करत आहेत. यातच आता भारताच्या एचएलएल लाइफकेअर लिमिटेडला मोठे यश मिळाले असून, कंपनीने कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी अँटीबॉडी किट तयार केली आहे.
या किटला एनआयव्हीकडून देखील हिरवा कंदील मिळाला आहे. या किटच्या वापरास परवानगी मिळाली असून, रुग्णाच्या सीरम, प्लाज्मा आणि रक्ताची अँटीबॉडी चाचणी करण्यात येईल. एचएलएल लाइफकेअर लिमिटेड हे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयांतर्गत काम करते.
अँटीबॉडी रक्त चाचणी किटमध्ये सर्वसाधारणपणे रुग्णाच्या रक्ताचे नमूने घेतले जातात. या चाचणीत रक्ताच्या नमून्यांचा रिझल्ट 15 ते 20 मिनिटात येतो. यासाठी रुग्णाच्या बोटातून सुईद्वारे रक्ताचे नमूने घेतले जातात. याद्वारे समजते की संशयिताच्या रुग्णात कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडी काम करत आहे की नाही.
ज्या लोकांमध्ये सुरूवातीला कोरोनाची लक्षणे दिसत नाहीत, अशांसाठी ही चाचणी महत्त्वाची ठरेल. मात्र कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे रॅपिड अँटीबॉडी रक्त चाचणी किट सांगत नाही. याद्वारे कोणत्या भागात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत, हे समजते.
जर रुग्णाची रॅपिड अँटीबॉडी रक्त चाचणी नेगेटिव्ह आली तर त्यानंतर आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. आरटी-पीसीआर चाचणी पॉजिटिव्ह असल्यास रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेऊन उपचार केले जातात. सोबतच त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध घेतला जातो.