भारताचा बांगलादेशवर एक डाव 130 धावांनी विजय
इंदूर : भारत-बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात भारताने आपला वरचष्मा कायम ठेवत बांगलादेशला मात दिली. पहिल्याच कसोटी सामन्यात चार विकेट राखून एका डावाने भारताने विजय संपादन केला. या सामन्यात भारताने सर्वच क्षेत्रात सुरेख कामगिरी केली.
फलंदाजीतील कामगिरीनंतर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत या सामन्यात विजयी झाला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात 343 धावांची विजयी अशी आघाडी घेतली होती. या डोंगरा ऐवढ्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावात संपुष्ठात आला.
तिसर्या दिवशी सकाळी भारताने पहिला डाव घोषित केला. त्यानंतर 343 धावांचा डोंगर घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव देखील कोसळला. पहिल्या डावा प्रमाणे दुसर्या डावात देखील मुस्ताफिझूर रेहमान (64) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. या विजयासह भारताने कसोटीमध्ये घरच्या मैदानावर सलग 13व्या विजयाची नोंद केली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करणार्या पाहुण्या बांगलादेश संघाने भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर पहिल्याच दिवशी शस्त्रे खाली ठेवली. अवघ्या 150 धावांतच बांगलादेशचा संघ गारद झाला. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांच्या तिकडीने मिळून बांगलादेशचे सात फलंदाज टिपले. त्यांना साथ मिळाली ती आर. अश्विनची. त्याने 2 बळी मिळविले.
पहिल्या डावात मुशफिकुर रहीमनं सर्वाधिक 43 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघानं पहिला डाव 6 बाद 493 धावांवर घोषित केला. सलामीवीर मयांक अग्रवालनं 243 धावांची खेळी केली. रोहित शर्मा अवघ्या सहा धावा करून बाद झाला. चेतेश्वर पुजारानं 54 धावा करून चांगली साथ दिली. कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला. अजिंक्य रहाणेनं 86 धावा केल्या. तर अष्टपैलू रवींद्र जडेजानं 60 धावांची तुफानी खेळी केली. उमेश यादवनंही 25 धावा केल्या. बांगलादेशकडून अबु झायेदने 4 विकेट घेतल्या.