ठाकरे सरकारने अवकाळीग्रस्तांच्या तोंडाला पुसली पाने - देवेंद्र फडणवीस
कोल्हापूर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशन संपताना कर्जमाफीची घोषणा केली. पण कर्जमाफीची सर्वाधिक गरज सध्या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना असताना ती त्यांना देण्यात न आल्यामुळे सरकारने अवकाळीग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच भाजप अवकाळीग्रस्तांच्या कर्जमाफीसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
फडणवीस पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे ९४ लाख हेक्टरवरचे पीक वाया गेले असल्यामुळे अशा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जे परत करण्याची त्यांची क्षमताच राहिली नसल्यामुळे कर्जमाफीची सध्या सर्वाधिक गरज या शेतकऱ्यांना होती. पण या लोकांना सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा होणार नाही.
फडणवीस सरकारवर टीका करताना म्हणाले, सरकारमधील पक्षांनी कर्जमाफीवरुन केलेले हे दुसरे घुमजावे आहे. कारण सत्तेतील तिन्ही पक्षांनी आपल्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफी, सातबारा कोरा करु अशा घोषणा दिल्या होत्या. सरकारने हिवाळी अधिवेशनात केवळ वेळ मारुन नेली आहे.
कर्जमाफीची सरकारची उधारीची घोषणा आहे. आजच्या अडचणीतील शेतकऱ्यांना थेट मदत होणे गरजेचे होते. तसेच सर्व प्रकारची मध्यम-दीर्घ मुदतीची सर्व कर्जे माफ केल्यास सातबारा कोरा होतो. यापूर्वी आमच्या सरकारनेच दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेतला असल्यामुळे या नव्या कर्जमाफीचा कोल्हापूरच्या भागात उपयोग होणार नाही. उलट अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना देखील या कर्जमाफी योजनाचा फायदा मिळाला पाहिजे. आपल्या आश्वासनांची सरकारने पूर्तता करायला हवी. लवकरच आम्ही याबाबत रस्त्यावर उतरुन अवकाळीग्रस्तांसाठीच्या कर्जमाफीची मागणी सरकारकडे करणार आहोत.