पवारांच्या सल्ल्याने उद्धव ठाकरेंची भेट घेणार एकनाथ खडसे
नवी दिल्ली- सोमवारी नवी दिल्लीत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भेट घेतली. सुमारे ३० मिनिटे या दोन्ही नेत्यांमध्ये बंद द्वार चर्चा झाली. खडसेंनी पवारांकडे पक्षात मिळणारी दुय्यम वागणूक व भाजपमधील लोकांकडून मुलीचा झालेला पराभव याबाबत मन मोकळे केले. त्यावर पवारांनी खडसेंना शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी ‘पुढील’ चर्चा करण्याचा सल्ला दिला, त्यानुसार खडसे मंगळवारी ठाकरेंना भेटणार आहेत.
खडसे दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीसाठी गेल्याची चर्चा होती. पण प्रत्यक्षात ते स्वपक्षीय एकाही नेत्याला न भेटताच परतले. पत्रकारांशी बोलताना खडसे म्हणाले, केंद्रीय जल आयोगाकडे जळगावातील पाण्याची योजना रखडली होती, आजच त्याला मान्यता मिळाली. परंतु अद्याप केंद्राची मंजुरी बाकी आहे.
आपण त्यामुळे पवारांची भेट घेतली. मला रोहिणीचा पराभव कसा झाला, हे त्यांनी विचारले. मी त्यावर वास्तवाची माहिती दिली, एवढेच उत्तर खडसेंनी दिले. पण प्रत्यक्षात पक्षात गेल्या चार वर्षांपासून अडगळीत पडलेल्या खडसेंचे भाजपमध्ये मन रमत नसल्याची चिन्हे आहेत.
खडसेंनी यापूर्वीच ओबीसी नेत्यांवर पक्षात अन्याय होत असून, आता वेगळा विचार करावा लागेल, असे संकेत दिले होते. खडसेंनी त्याचाच एक भाग म्हणून पवारांची भेट घेतल्याचे मानले जाते. खडसे व उद्धव ठाकरेंची मंगळवारी भेट होणार आहे. त्यानंतर पवार व ठाकरे यांच्यात चर्चा होऊन खडसेंबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.