शिवबंधन सोडून 400 शिवसेना कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
मुंबई – सुमारे 400 शिवसेना कार्यकर्त्यांनी शिवबंधन सोडून मुंबईतील धारावी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या 7 दिवसांत ही घटना घडली आहे.
59 वर्षीय वर्षीय शिवसेना पक्षप्रमुखांनी राज्याचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून औपचारिकपणे पदभार स्वीकारला होता. यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या एका एका वृत्तानुसार, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्याशी राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी, शिवसेनेने हातमिळवणी केली. या कार्यकर्त्यांना हीच गोष्ट खटकल्यामुळे त्यांनी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला.
सेनेचे कार्यकर्ते रमेश नदेसन यांनी याबाबत बोलताना सांगितले की, शिवसेनेने भ्रष्ट आणि हिंदु-विरोधी पक्ष यांच्यासोबत हातमिळवणी केल्यामुळे, आपली फसवणूक केल्याच्या भावनेने शिवसेनेच्या 400 समर्थकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाले. आपल्याशी भाजप खोटे वागल्यामुळे शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला.
सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे बहुमत नसल्याने, सत्ता स्थापनेचा शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केला. त्यानंतर विधानसभेत त्यांनी 169 आमदारांसह आपले बहुमत सिद्ध केले. दरम्यान याआधी शिवसैनिक रमेश सोलंकी यांनी शिवसेनेच्या युवा सेना युनिटमधून राजीनामा दिला होता. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या युतीबद्दल त्यांनी आपला संताप व्यक्त करत पक्षातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता.