
उद्धव ठाकरे घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधीचा सोहळा संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटाला पार पडणार आहे. उद्धव ठाकरेंच्या रुपाने महाराष्ट्रात 20 वर्षांनतंर शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे.
शपथविधीचा भव्य दिव्य सोहळा शिवतिर्थावर पार पडणार आहे. शपथविधीच्या या कार्यक्रमाला महाविकासआघाडीचे नेते उपस्थित असणार आहेत. बुधवारी आदित्य ठाकरे आणि मिलींद नार्वेकर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींना शपथविधीच्या सोहळ्याचं आमंत्रण दिलं. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना देखील शपथविधीचे आमंत्रण देण्यात आले आहे.
शपथविधीच्या पार्श्वभूमीवर शिवतिर्थावर आणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त करण्यात आले आहे. तसेच शपथविधीमुळे वाहतूकीत बदल करण्यात आले आहे.