दुसरी कसोटी, पुण्यात घोंगावले ‘विराट’ वादळ
पुणे : भारतीय संघ दक्षिण आफ्रिके विरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मजबूत स्थितीत असून दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा आफ्रिकेने तीन विकेट गमावत 36 धावा केल्या. 601 धावांवर भारताने डाव घोषित केल्यानंतर पहिल्या ओव्हरमध्येच उमेश यादवने दक्षिण आफ्रिका संघाला मोठा झटका दिला. भारताने दिलेल्या आव्हानाच पाठलाग करताना उमेश यादवने 4 ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले.
संघाने धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारताला उमेश यादवने मोठे यश मिळवून दिले. दुसऱ्याच ओव्हरमध्ये उमेशने भारताला पहिले यश मिळवून दिले. माक्रम शुन्यावर तर एल्गार 6 धावांवर बाद झाला. त्यानंतर शमीने टेंम्बाला 8 धावांर माघारी धाडले. दक्षिण आफ्रिकेला कमबॅक करण्यासाठी फलंदाजांनी चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.
दरम्यान, भारताने पहिल्या दिवशी 273 धावा केल्या होत्या. तर, दुसऱ्या दिवशी विराट आणि रहाणे यांच्या शतकी भागिदारीमुळे भारताचा डाव पुढे सरकरला. 10 महिन्यांनंतर विराटने शतकी कामगिरी केली तर, 58 धावांवर रहाणे बाद झाला. त्यानंतर विराटने जडेजासोबत विक्रमी अशी 225 धावांची भागिदारी केली. जडेजा 91 धावांवर बाद झाला, त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही.
दरम्यान विराट हा भारताकडून सर्वात जास्त दुहेरी शतक लगावणारा पहिला फलंदाज आहे. याआधी सचिन आणि सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सहावेळी द्विशतकाची कामगिरी केली होती. तर, ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉंटिंग, श्रीलंकेचा मर्वन अटापट्टू, पाकचा जावेद मियांदाद आणि युनिस खान यांनी 6 वेळा ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्व दुहेरी शतक कर्णधार असताना लगावले आहे. तर, विराटने 7 पैकी 6 दुहेरी शतक भारतात झळकवले आहे. तर, आयसीसी टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दुहेरी शतक लगावणारा विराट पहिला कर्णधार ठरला आहे.
तब्बल 9व्यांदा 150 किंवा त्यापेक्षा जास्त धावा विराट कोहलीने केल्या आहे. विराटने या विक्रमासह ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. या लिस्टमध्ये सात वेळा 150 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या तीन फलंदाजांचा समावेश आहे. यात ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क, श्रीलंकेचा महेला जयवर्धने आणि वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा या दिग्गजांचा समावेश आहे.