निवडणूक लढवण्यापासून अमितलाही रोखणार नाही – राज ठाकरे
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढण्यावर पहिल्यांदाच भाष्य केले आहे. आदित्य ठाकरे असो किंवा पुत्र अमित ठाकरे, त्यांना निवडणूक लढवावीशी वाटत असेल, तर त्यात गैर काय? असे म्हणत राज ठाकरेंनी पाठिंबा दिला.
निवडणूक कोणी लढवावी की नाही, हे प्रत्येकाने आपले ठरवावे. उद्या जर अमितला निवडणुकीत उतरायचे असेल, आणि याबाबत तो ठाम असेल, तर मी त्याला नकार देणार नाही. पण स्वतःविषयी जर त्याला खात्री वाटत नसेल तर कोण काय करु शकेल? असे राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
आधीपासूनच बाळासाहेब व्यंगचित्रकार होते. माझे आजोबा म्हणाले होते, की जे जे स्कूल ऑफ आर्ट्सला याला पाठवू नका, याचा हात खराब होईल. उद्धव किंवा मी जेव्हा जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचे म्हटले, तेव्हा त्यांनी नकार नाही दिला. त्यांनी आपली मत आमच्यावर लादण्याचा कधी प्रयत्न नाही केला.
हे उदाहरण देत आपल्या पुढच्या पिढीला निवडणूक लढण्याबाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. आमच्या मुलांना जर निवडणूक लढवावी असे वाटत असेल, तर आम्ही त्यांना मागे खेचणार नसल्यामुळे आदित्यला निवडणूक लढवायची असेल, तर त्यात चूक काय? असे राज ठाकरे म्हणाले.