आदित्य ठाकरे यांचं अखेर ठरलं, 2 किंवा 3 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज
शिवसेना नेते आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार की नाही यावरून बरेच तर्क वितर्क लढवले जात होते. अखेर आदित्य ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण आदित्य ठाकरे 2 किंवा 3 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज भरू शकतात अशी खात्रीलायक माहीती आहे.
वरळी विधानसभा मतदार संघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. आता ते या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. युतीची घोषणा लांबल्यामुळे आदित्य यांची उमेदवारी पक्षाने अधिकृतपणे अजून घोषित केलेली नाही.
युतीच्या घोषणेच्या पत्रकार परिषदेत किंवा त्यानंतर लगेच शिवसेना नेते स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर करण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरेंच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या निमित्ताने वरळीत शिवसेना मोठे शक्तिप्रदर्शन करू शकते.