बारामतीत कर्‍हेला पूर; 23 हजार जणांचे स्थलांतर

Thote Shubham

 पुरंदर तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे कर्‍हा नदीला पूर आला आहे. पुण्यासह पुरंदर तालुक्याला देखील पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे तालुक्यातील नाझरे धरण भरले आहे. त्यामुळे नाझरे धरणातून कर्‍हा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत 85 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

त्यामुळे नदीकाठच्या गावांसह बारामती शहराला सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, नदीकाठच्या गावांमध्ये पूराचे पाणी शिरले आहे. जिल्हा प्रशासनाने आधीत खबरदारी घेत नदीकाठी राहणार्‍या सुमारे   काही हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवल्यामुळे जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, नदीकाठच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

बारामती तालुक्यातील कर्‍हा नदी काठच्या आंबी बुद्रुक, आंबी खुर्द, मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, कार्‍हाटी, फोंडवाडा, जळगाव सुपे, जळगाव कप, अंजनगाव, कर्‍हावागज, बर्‍हाणपूर, नेपतवळण, मेडद तसेच बारामती शहरालगची खंडोबानगर, पंचशीलनगर, टकार कॉलनी, म्हाडा कॉलनी परिसरामध्ये पूराचे पाणी शिरले आहे.

पूराच्या पाण्याचा धोका होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाने या गावातील नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी हलवले आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांनी घरातील सर्व वस्तू सुरक्षितस्थळी हलवल्या आहेत. दरम्यान, बारामती-मोरगाव, जेजूरी-सासवड रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

मध्यरात्री तीन वाजल्यापासून प्रशासनाकडून लाऊड स्पिकर लावून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे घाबरून आधीच नदी काठच्या नागरिकांनी घरं सोडली. सध्या त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. 23 वर्षानंतर कर्‍हानदीला पूर आला असल्याची माहिती स्थानिक वयोवृध्द नागरिक देत आहे. आतापर्यंत बारामती तालुक्यातील 15 हजार, बारामती शहरातील 6 हजार 500 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.


Find Out More:

Related Articles: