सरकारकडून सामान्य जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न - राहुल गांधी
नवी दिल्ली कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाट येथील सत्याग्रहाच्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला. राहुल म्हणाले की, जनतेच्या आवाजाने ब्रिटीशांना प्रेमाने शांततेत देशातून हाकलून लावले.
याच जनतेच्या आवाजाने भारताची अर्थव्यवस्था बनविली. त्या आवाजाशिवाय भारताचे अस्तित्व राहणार नाही. देशातील शत्रूंनी हा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. या शत्रूंनी देशाची अर्थव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न केला पण लोकांच्या आवाजाने हे होऊ दिले नाही.
राहुल म्हणाले, जे काम देशाचे शत्रू करू शकले नाहीत, ते आज नरेंद्र मोदी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमची प्रगती नष्ट होईल आणि देशाचा आवाज शांत व्हावा, असा त्यांचा प्रयत्न आहे. नरेंद्र मोदी जेव्हा न्यायपालिकेवर दबाव आणतात तेव्हा ते देशाच्या आवाजाला इजा करतात. जेव्हा ते विद्यार्थ्यांवर गोळ्या झाडतात तेव्हा ते देशाचा आवाज शांत करण्याचा प्रयत्न करतात.
जेव्हा ते पत्रकारांना घाबरवतात तेव्हा ते देशाचा आवाज घाबरवण्याचा प्रयत्न करतात. राहुल म्हणाले, 'मोदी जी तुम्ही कॉंग्रेस पक्षाशी लढा देत नाही, हा कॉंग्रेस पक्ष नाही, तर ज्या देशाच्या विरोधात तुम्ही उभे आहात त्या देशाचा आवाज आहे. हा भारत मातेचा आवाज आहे आणि जर तुम्ही त्याविरूद्ध उभे राहिले तर भारत माता तुम्हाला जबरदस्त उत्तर देणार आहे.