मोदींनी जाती-पातीत न बसणाऱ्या माझ्यासारख्याला मुख्यमंत्री केलं : देवेंद्र फडणवीस

Thote Shubham

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये झाला. यावेळी नाशिकमधील सभेला मोठी गर्दी होती. मोदींच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 5 वर्षांच्या कार्याचा थोडक्यात आढावा मांडला.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी “आपण सोशल इंजिनिअरिंग अर्थात जाती-पातीच्या राजकारणात बसत नसतानाही, माझ्यासारख्याला मोदींनी मुख्यमंत्री केलं. या पाच वर्षात मी पारदर्शी आणि प्रामाणिकपणे सरकार चालवण्याचं काम केलं” असं नमूद केलं.

ज्या नाशिकमध्ये रामराज्याची संकल्पना सुरु झाली, त्याठिकाणी सभेची सांगता होत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवाले जनतेला विसरले म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं. जिथे गेलो त्याठिकाणी लोकांचा प्रचंड आशीर्वाद मिळाला. जनादेश यात्रेला मिळालेला प्रतिसाद आमच्यामुळे नाही तर मोदीजींमुळे आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“भाजपच्या महाजनादेश यात्रेत माता बघिनींनी अभूतपूर्व स्वागत केलं. उज्वला योजनेने महिलांच्या डोळ्यातले आश्रू दूर केले. मी यात्रा काढली त्यावेळी शरद पवार म्हणाले मुख्यमंत्री हिशोब देत आहेत. पण तुमची मानसिकताच राजेशाहीची आहे. त्यामुळे लोकांनी सेवकाला निवडून दिलं. काँग्रेसचं महाराष्ट्रात अस्तित्वच नाही”.  असं मुख्यमंत्री म्हणाले.

या निवडणुकीत शिवरायांच्या वंशाची साथदेखील मिळाली. महाराष्ट्रात उद्योग, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, रोजगारात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

शेतकऱ्यांकरता दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. नारपार,पिंजाळच्या माध्यमातून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दुष्काळमुक्त करायचा आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकांच्या हाती रोजगार द्यायचा आहे. 1 कोटींपेक्षा जास्त युवकांना रोजगार दिला. नाशिकला हायब्रीड मेट्रो देतोय, डिफेन्स क्लस्टर देतोय. मोदीजीने सिखाया है आम्ही सेवक आहोत आणि सेवकच राहू. तुमचा जनादेश आम्हाला द्या, असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं.



Find Out More:

Related Articles: