विधानसभा निवडणुकीत महायुतीला 229 जागा मिळणार, भाजपच्या सर्व्हेतील अंदाज

Thote Shubham
आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्षाकडून एक सर्वेक्षण (सर्व्हे) करण्यात आले आहे. या सर्वेक्षणानुसार विधानसभा निवडणुकीत महायुती 229 जागा जिंकणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आठवड्याभरातच युतीच्या जगावाटपावर तोडगा काढण्यासाठी बैठकीचं सत्र सुरु होणार आहे.

2014 साली स्वतंत्र लढलेले शिवसेना - भाजप हे पक्ष यंदाची विधानसभा निवडणूक युतीत लढणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार विधानसभेत युतीला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या संख्याबळानुसार महायुती आणि अपक्ष मिळून 183 जागांचं बहुमत आहे.
सर्व्हेच्या आकड्यांनुसार त्यात आणखी 40 ते 50 जागांची भर पडण्याची शक्यता आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादी फक्त 50 ते 60 जागांपर्यंत सीमित राहण्याची चिन्हं दिसत आहेत.
विशेष म्हणजे सर्व्हे करणारा पक्ष म्हणून ओळख असणाऱ्या भाजपने महायुती होणार, ही बाब लक्षात घेऊन सर्व्हे केलेला आहे. याचाच अर्थ युतीत निवडणूक लढवण्याची भाजपची भूमिका स्पष्ट होत आहे.

दरम्यान, 13 सप्टेंबर रोजी विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी जालना येथे विविध महामंडळावर नियुक्त झालेल्या सदस्यांचा ओबीसी समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात ते बोलत होते.                                 


Find Out More:

Related Articles: