भाजप कार्यकर्त्यांना अच्छे दिन
सातारा – राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे भाजपमध्ये प्रवेश होत असल्यामुळे नेत्यांना अच्छे दिन आल्याचे दिसून आले. मात्र, सातारा-जावली विधानसभा मतदारसंघात चित्र उलटे आहे. मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रवेशामुळे चक्क भाजप कार्यकर्त्यांना अच्छे दिन येत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. कारण, विधानसभा मतदारसंघावर कायम दोन्ही राजेंची पकड राहिलेली होती. त्यामुळे भाजपचा काही प्रमाणात शिरकाव होऊनदेखील खंबीर नेतृत्व न लाभल्याने कार्यकर्ता कायम दुर्लक्षित राहिला होता. मात्र, आता आ. शिवेंद्रसिंहराजेंनी प्रवेश केल्यामुळे कार्यकर्त्यांना अच्छे दिन येत असल्याचे दिसून येत आहे.
सातारा शहरात भाजपच्या वतीने नुकत्याच आयोजित कार्यक्रमास आ. शिवेंद्रसिंहराजे उपस्थित राहत भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांशी समरस झाले. यावेळी माजी नगरसेवक विजय नाफड, किशोर गोडबोले, विजय काटवटे, सुवर्णाताई पाटील, कविता कचरे, अप्पा कोरे, सुवर्णा घोरपडे, स्वाती देशपांडे, वंदना ओतारी, सुवर्णा राजे आदी उपस्थित होते. दरम्यान, दोन्ही राजेंपैकी खासदार उदयनराजे भोसलेदेखील यापूर्वी भाजपमध्ये होते. मात्र, जनता हाच माझा पक्ष हे धोरण कायम ठेवल्याने त्यावेळी देखील भाजप कार्यकर्त्यांना म्हणावे असे अच्छे दिन आले नव्हते. परंतु आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची कार्यशैली वेगळी आहे. यापूर्वी राष्ट्रवादीमध्ये असतानादेखील त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला कायम उपस्थिती दर्शविली आणि पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे वाटचाल ठेवली. एवढेच नव्हे तर भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी रितसर आमदारकीचा राजीनामा देखील दिला.
आता भाजपमध्ये प्रवेश करून नवीन राजकीय इनिंगला त्यांनी सुरूवात केली आहे. भाजपमध्ये त्यांनी केलेल्या प्रवेशामुळे दुर्लक्षित कार्यकर्त्यांना न्याय मिळणार आहे. कारण, सातारा नगरपालिकेत भाजपचे सहा नगरसेवक असूनदेखील त्यांचा आवाज दाबला जायचा. केंद्रात व राज्यात सत्ता असून देखील साताऱ्यात मात्र नगरसेवकांसह कार्यकर्ते दुर्लक्षित राहिले. एक दोन नगरसेवकांनी टोकाचा संघर्ष देखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सातारा विकास आघाडीने संख्याबळाच्या जोरावर निर्णय घेतले. आता नगरपालिकेतील चित्र बदलताना दिसून येत आहे.
40 सदस्य संख्या असलेल्या नगरपालिकेत 22 सदस्य खा. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीकडे तर 12 सदस्य आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या नगरविकास आघाडीचे आणि भाजपचे 6 सदस्य निवडून आले होते. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रवेशामुळे आता पालिकेतील चित्र 22 विरूध्द 18 असे झाले आहे. परिणामी विरोधी गट प्रबळ झाला असून येत्या काळात त्याचे पडसाद पालिकेत दिसून येणार आहेत.
त्याचबरोबर आ. शिवेंद्रसिंहराजें यांच्याकडे जिल्हा बॅंक, अजिंक्य उद्योग समूहाची सुत्रे आणि जिल्हा परिषदेत देखील नऊ सदस्यांमुळे वर्चस्व आहे. त्याचा लाभ भाजपच्या कार्यकर्त्यांना मिळू शकणार आहे. एकूणच सर्व चित्र पाहता आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रवेशामुळे त्यांना येत्या काळात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची आशा आहे व त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांना देखील सन्मानपूर्वक “अच्छे दिन’ येणार असल्याची चर्चा आहे.