
भाजप-सेना युतीचा 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युला
'लोकसभा निवडणुकीत राज्यातील सव्वादोनशे विधानसभा मतदारसंघात महायुतीला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे हा उत्साह आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवावे,' असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केले. विधानसभेला भाजप-सेना युती वाटपाचा 'फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्युला ठरल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
केंद्रीय राज्यमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल दानवे यांचा पिंपरी-चिंचवड भाजपच्या वतीने संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पुण्याचे खासदार गिरीश बापट, पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, योगेश टिळेकर, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे या वेळी उपस्थित होते. पक्षाच्या नवीन कार्यालयाचे ई-उद्घाटनही या वेळी करण्यात आले.