ट्विंकलच्या त्या प्रश्नाला अक्षयने दिले असे उत्तर
देशभरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यातच आता या कोरोनाविरोधातील लढाईसाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. यामध्ये सर्वात पुढे बॉलीवुड अभिनेता अक्षय कुमार असल्याचे दिसून आले.
पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी त्याने २५ कोटीचा आर्थिक निधी देऊन देशासमोर मोठे उदाहरण समोर ठेवले आहे. दान करण्यात आलेली आतापर्यतची ही मोठी रक्कम आहे. तो केवळ मोठ्या पडद्यावरचा नव्हे तर खऱ्या आयुष्यात देखील हिरो असल्याचे त्याने दाखवून दिले.
सोशल मीडियातून अक्षयच्या या निर्णयाचे कौतूक होत आहे. यासंदर्भात अक्षयची पत्नी ट्विकंल खन्नाने देखील ट्विट करत अक्षयचे कौतूक केले आहे. माझ्या पतीचा मला गर्व आहे. मी त्याला जेव्हा विचारले की खरच तू २५ कोटी रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी देतो आहेस का? कारण ही खूप मोठी रक्कम आहे.
तर अक्षयने यावर तात्काळ उत्तर दिले. मी जेव्हा करियरची सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हते. आता मी मदत करण्याच्या स्थितीत असल्यामुळे ज्यांच्याकडे काहीच नाही अशांना मदत करण्यापासून मी कसा काय रोखू शकतो ? असे तो म्हणाला.