लॉकडाऊन : पुण्यातील मजूरांच्या मदतीसाठी पुढे आला धोनी
कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने देशभरात 21 दिवस लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीत अनेक मजूरांना रोजगार गमवावा लागला आहे. पुण्यातील मजूरांचे देखील अशा परिस्थितीत हाल होत आहे. आता या पुण्यातील मजूरांच्या मदतीसाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी पुढे आला आहे.
पुण्यातील मजूरांच्या मदतीसाठी धोनीने एका संस्थेला 1 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था पुण्यातील मजूरांना जेवण पुरवण्याचे काम करत आहे. संस्थेने मजूरांना पुढील 14 दिवस जेवण देण्यासाठी फंड डोनेट करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर धोनीने सर्वाधिक 1 लाख रुपये दान केले. या मदतीसोबतच धोनीने पुढील 14 दिवस 100 कुटुंबाच्या जेवणाची सोय केली आहे. धोनीशिवाय अनेक माजी क्रिकेटपटू आणि कलाकारांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने कोरोनाशी लढण्यासाठी 50 लाख रुपयांची मदत केली आहे.