तान्हाजी चित्रपटाला कर्नाटक नवनिर्माण सेनेचा विरोध
बेळगाव : काल देशभरात अजय देवगनचा ‘तान्हाजी- द अनसंग वॉरिअर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपट प्रेक्षकांच्या पंसतीस उतरताना दिसत आहे. पण कर्नाटक नवनिर्माण सेनेने बेळगावातील ग्लोब चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटाला विरोध दर्शविला आहे.
कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या मूठभर कार्यकर्त्यांनी चित्रपटाचे पोस्टर खाली उतरवण्यास भाग पाडले. चित्रपटाचे पोस्टर्स खाली उतरवण्याची घटना काल दुपारी घडली आणि महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी संध्याकाळी तानाजी चित्रपटाचे पोस्टर पुन्हा लावून फटाके फोडून मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.
कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या भीमाशंकर याने काही दिवसांपूर्वी एकीकरण समिती नेत्यांबद्दल बेताल वक्तव्य केले होते. त्यानंतर कोल्हापुरात शिवसेनेने कन्नड चित्रपट ‘श्रीमन्ननारायण’चे प्रदर्शन बंद पाडले होते. शिवसेनेने कोल्हापुरात कन्नड चित्रपटाचे प्रदर्शन बंद पाडल्यामुळे कर्नाटकात आम्ही तानाजी चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याची भूमिका कर्नाटक नवनिर्माण सेनेने घेतली आहे.
तानाजी चित्रपटाला पोलीस संरक्षणात दाखल झालेल्या मूठभर कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविणाऱ्या घोषणा दिल्या. नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस तेथून हटवले. एकीककरण समितीच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी सायंकाळी ग्लोब थिएटरकडे जमून खाली उतरवलेले पोस्टर पुन्हा वर लावले. यावेळी युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि उपस्थितांना मिठाई वाटली.